संगीतकार उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून राशीद खान हे कर्करोगाशी झुंज देत होते. पण मंगळवारी त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्यात राशीद खान यांना मेंदूचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांनी सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती.
राशीद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. तर त्यांनी संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान (1909-1993) यांच्याकडून घेतले होते. राशीद खान हे उस्ताद रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक होते. तसेच वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता.
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी उस्ताद राशीद खान यांनी ‘आओगे जब तुम’ हे गाणे गायले होते, जे खूप लोकप्रिय झाले होते. याशिवाय त्यांनी ‘माय नेम इज खान’, ‘राझ 3’, ‘मंटो’ आणि ‘शादी में जरूर आना’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली होती.