पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी १३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधींचे स्वागत केले. तसेच त्यांनी या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी शिखर परिषदेच्या महत्त्वावर भर दिला. या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी Czech गणराज्य, मोज़ाम्बिक आणि तिमोर-लेस्तेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ मध्ये बोलताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, ”या परिषदेमध्ये ३४ भागीदार देश आणि १३० पेक्षा जास्त देशांतील प्रतिनिधींचे व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही कल्पना जगासमोर आणली आहे. भारताला G20 चे अध्यक्षपद मिळाले, त्यामुळे देशाचा अभिमान वाढला.” भूपेंद्र पटेल यांनी G20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल भारताचा अभिमान अधोरेखित केला तसेच या शिखर परिषदेचा गुजरातच्या जागतिक स्थितीवर आणि भागीदारीवर सकारात्मक प्रभाव पडेल असा आशावाद व्यक्त केला.
पुढे बोलताना भूपेंद्र पटेल म्हणाले, ”व्हायब्रंट परिषदेचे प्रणेते आणि आर्किटेक्ट पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेला बिझनेस बॉण्डिंगसह एकात्मतेचे व्यासपीठ म्हटले आहे. आज तुमची सर्वांची उपस्थिती त्याचा पुरावा आहे.” गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की या वर्षीच्या शिखर परिषदेत स्वाक्षरी करण्यात आलेले बहुतेक सामंजस्य करार ग्रीन एमओयूचे होते. या परिषदेमुळे आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळणार आहे.