अयोध्या : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुजारी आणि संत उपस्थित राहणार आहेत. तर आता अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टने उपस्थित राहणाऱ्या पुजारी आणि संतांसाठी निवास व्यवस्था केली आहे.
निवास व्यवस्थेमध्ये आरोग्य समस्या उद्भवल्यास उपचारासह पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती आचार्य सुरज तिवारी, विधी विभाग, जौनपूर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, निवास व्यवस्थेमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच 14 जानेवारीला सायंकाळी सर्व पुजारी येणार असून 15 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरूवात होणार आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, वृद्ध पुजाऱ्यांसाठी 10 व्हीव्हीआयपी खोल्या असणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या पुजाऱ्यांसाठी 50 इतर खोल्या असणार आहेत. तसेच या अतिथींसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी होणार्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 4,000 संतांना आमंत्रित केले आहे. तसेच 16 जानेवारीपासून सुरू होणारा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा हा सात दिवस चालणार आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला पहाटे पूजेनंतर, दुपारी ‘मृगशिरा नक्षत्र’मध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.