राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय काही तासातच जाहीर होणार आहेत.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून केवळ आमदारांचीच नाही, तर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे
शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत मान्यता दिलीआहे तसेच धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. विधानसभेमध्ये 67 टक्के बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला आधीच अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली असून निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे.
अपात्रेबाबतचा आजचा निर्णय हा मेरीटवर होईल अशी मला अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आल्यावर आमची भूमिका मांडू. त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायव्यवस्था संस्था चांगली. नाही लागली की न्यायव्यवस्था वाईट, असे कसे चालेल असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना विचारला आहे.
दीड वर्षांपूर्वी म्हणजे 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर त्यांना येऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली. नंतर शिंदेंनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगात गेला.निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत पक्षावर त्यांचा दावा योग्य ठरवला होता.
पण त्याचवेळी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पक्षांतर बंदीच्या कायद्याखाली ह्या बाहेर पडलेल्या शिंदेसह 16 बंडखोर आमदारांना अपात्र करा अशा आशयाची याचिका उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली. त्याचवेळी आपलीच सेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखले केली. आता त्याचबाबतीत थोड्याच वेळात फैसला होणार आहे.