जगभरात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची ओढ लागली असून 22 जानेवारी रोजी जगभरातील रामभक्त दिवाळी साजरी करणार आहेत. सर्व समाज घटकात या क्षणाची ओढ लागलेली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील महादेवराव गायकवाड यांना सपत्नीक पूजा करण्याचा मान मिळाला आहे. श्रीरामाची पूजा करताना 11 मुख्य जोडपी पूजा करणार असून त्यापैकी एक जोडपे गायकवाड दाम्पत्य असणार आहे. मंदिर ट्रस्टमार्फत त्यांनासुद्धा सस्नेह निमंत्रण मिळाले आहे.
महादेवराव गायकवाड हे कैकाडी समाजाचे असून धाराशिव जिल्ह्यातील काक्रंबा हे त्यांचे मूळ गाव आहे. श्रीराम मंदिर आंदोलनात ते सक्रिय कार्यकर्ते होते. मागील अनेक वर्षापासून भटके विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी ते कार्यरत आहेत. तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी प्रकल्पात भटक्या समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ‘पालावरची शाळा’ या अभिनव उपक्रमातून त्यांनी भटक्या समाजातील मुलांना सुशिक्षित व सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्यांना आलेल्या निमंत्रणमुळे भटके विमुक्त समाजात अतिशय आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
या व्यतिरिक्त अन्य सात जणांनाही अयोध्येचे निमंत्रण!
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित प्रतिनिधी बोलावण्यात येत आहे. त्यामध्ये भटके विमुक्त समाजातील सात प्रतिनिधींना सुधा निमंत्रण आले आहे. त्यामध्ये भिवंडी येथील मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्थेचे दीपक लोंढे यांनाही अयोध्येचे निमंत्रण आहे. मांग गारुडी समाजातील कचरा वेचणार्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून दीपक लोंढे अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत. समाजात सामाजिक व आर्थिक बदल आणण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
Tags: NULL