स्त्रीत्व हीच स्त्रीची शक्ती : लेखिका शेफाली वैद्य
नगर – स्त्रीत्व हीच स्त्रीची शक्ती आहे याची जाणीव महिलांना होणे महत्त्वाचे आहे. स्वतःची ओळख स्वतःला होणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री कर्तृत्ववान असते. जागरूक स्त्रीशक्ती वर भारताचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी केले.
नगरमध्ये आयोजित देवी अहिल्या महिला संमेलनाचे उद्घाटन शेफाली वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या पूजनाने झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल, भारत भारतीच्या महिला अध्यक्षा विनया शेट्टी, संमेलनाच्या संयोजिका सारिका ढोकणे आदींसह जिल्ह्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या.
शेफाली वैद्य पुढे म्हणाल्या की, अन्याय होतो म्हणून रडत बसू नकोस त्याविरुद्ध काहीतरी कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे संस्कार आई-वडिलांनी मुलांवरती करावे. मातृशक्तीत खूप ताकद असल्याने अन्यायने रडत न बसता सक्षमपणे तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीवादात आहे. गार्गी, मैत्रेयीची आमची परंपरा आहे. भारतीय मुलींनी सैन्यात फायटर विमानाच्या पायलट ते सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पाश्चात्य स्त्रीवादाच्या नादी न लागता आपल्यातील सामर्थ्य ओळखून त्याचा वापर करून बाकीच्यानाही मदत करता आली पाहिजे. स्वतःबरोबरच सभोवतालचा आसमंत सुंदर करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते. निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची पूर्ती आनंद देते.
डॉ. निशिगांधा मोगल म्हणाल्या की, पूर्वी आपल्या परंपरेत स्त्रीपुरुष भेद कधीच नव्हता. स्त्री आणि पुरुष हे दोघेही द्विदल धान्या सारखे आहेत. वेदकाळातही स्त्रियांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. सीता, रुक्मिणी यांचे स्वयंवर झाले, म्हणजे अनुरूप पती निवडण्याचा अधिकार त्यावेळीही स्त्रीला होता. विविध परकीय आक्रमणे भारतावर झाल्याने आपली संस्कृती लोप पावत आहे. भारतीय संस्कार व संस्कृती महत्वाचे आहेत. यासाठी आज धर्मशिक्षण महत्त्वाचे आहे. धर्मशिक्षण याचा अर्थ समाजात कसे वागावे, प्रगती कशी करावी, त्याग कसा करावा याचे शिक्षण होय. स्वधर्म पालनातच भगवतगीद्गीतेचा सार सामावलेले आहे. आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेला महत्त्व आहे. त्यामुळे संस्कारांचे आदानप्रदान आणि संस्कृतीचे जतन होते.
विनया शेट्टी म्हणाल्या, परस्पर संवाद आणि महिलांची एकजूट यासाठी महिला संमेलने आवश्यक असतात. पालकांनी आपल्या मुलांना चांगले मार्गदर्शन करावे व
उत्तम संस्कार द्यावेत. त्यामुळे त्यांचे उज्वल भविष्य घडेल.
प्रास्तविकात सारिका ढोकणे यांनी स्त्रीचां राष्ट्रीय कार्यातील सहभाग व संमेलनाचा उद्देश याबद्दल माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय नीता राशीनकर यांनी करून दिला. आभार सविता तागडे यांनी मानले. सूत्रसंचालन स्वाती रानडे व भारती फडके यांनी केले. यावेळी झालेल्या गट चर्चासत्रात महिलांचा उल्लेखनीय सहभाग घेत विविध विषयांवर महिला उस्फूर्तपणे अभिव्यक्त झाल्या. आ.मोनिका राजळे, धनश्री विखे, अक्षय कर्डिले यांनी संमेलनास भेट दिल्या. संमेलनासाठी पोखरणा ज्वेलर्स, कुबेर मार्केटचे विशाल पतके, सारी संगमचे सुदर्शन डुंगरवाल, साई सूर्य नेत्रसेवेच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी सहकार्य केले.
देवी अहिल्या महिला संमेलन स्थळी वेद पुराणकालीन, मध्ययुगातील, रामायण आणि महाभारत काळातील तसेच क्रीडा, सामाजिक, कला, साहित्य, विज्ञान, राजकीय, प्रशासन या विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांच्या फोटोचे आणि त्यांच्या संक्षिप्त माहितीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उद्घाटन सत्रात युवतींनी सादर केलेल्या मनोरम यष्टी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे