भारताचा अमृतकाळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात ठाणे इथे 38 वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला सुरु आहे. त्यात रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावरील व्याख्यानाचे पुष्प गुंफतांना ते मंगळवारी रात्री बोलत होते.
सर्व धर्म, जाती, संप्रदाय यांना जोडून सबका साथ सबका विश्वास या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे. राम हे एकात्म आणि मानवतावादाचे प्रतीक आहेत. श्रीरामाची पूजा म्हणजेच राष्ट्रपूजा आहे असे ठाकूर म्हणाले. गरीब-वंचितांच्या कल्याणासाठी गेल्या 9 वर्षात खूप काम झाले आहे. हे श्रीरामाच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. मोदी यांनी सांगितलेले 9 आग्रह आणि पंचप्रण ही राष्टपूजाच आहे त्याचे सर्वांनी अनुसरण करावे असे आवाहन ठाकूर यांनी केले.
डिजीटल इंडियाच्या माध्यमातून भारताचे पुनर्निर्माण होत आहे. आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही काळात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था निश्चितच बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. अल्पावधीतच अनेक क्षेत्रात मोठे काम सरकार करत आहे. देशात नवनवे किर्तीमान स्थापित होत आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकासाबरोबरच आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे. आत्मनिर्भर भारतातून विकसित नवा भारत निर्माण करायचा आहे असे ते म्हणाले.
जगावर नजीकच्या काळात सर्वात मोठे संकट कोसळले ते कोरोनाचे. भारताने त्यातून उभारीच घेतली नाही तर जगाला मदत केली. आधी लसी आयात करणाऱ्या भारताने कोरोना काळात दोन लसींची निर्मिती केली. संपूर्ण देशाला सुरक्षित केलेच, इतर देशांनाही कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला. आता भारताला विकसित भारत बनवायचे आहे. यातूनच राष्ट्र पूजा होणार असल्याचे ते म्हणाले. आयोध्येत राममंदिर पूर्णत्वाकडे जात आहे. ते येत्या 22 जानेवारीला खुले होणार असल्यामुळे देश पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज आहे. तमाम भारतीयांचे स्वप्न आता लवकरच साकारणार आहे अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला.
2014 पर्यंत भारतात 65 टक्के लोकसंख्या ही उघडयावर शौचाला जात होती. केवळ तीन कोटी जनतेला नळाद्वारे पाणी येत होत. सुमारे 50 टक्के जनतेचे बँकेत खाते नव्हते. ही उणीव वर्तमान केंद्र सरकारने भरुन काढली. 74 वरुन 150 विमानतळे झाली. एक हजार 100 विद्यापिठे झाली. आगामी 2047 पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल, असा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार संजय केळकर, संजय वाघुले आदी उपस्थित होते. या व्याख्यानमालेला ऐकण्यासाठी मोठया संख्येने ठाणेकरांनी गर्दी केली होती.