येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच आता राम मंदिराच्या बांधकामाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळीचे राम मंदिराचे नयनरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आता राम मंदिरातील आणखी काही फोटो समोर आले आहेत. नुकताच मंदिराला सोन्याचा पहिला दरवाजा बसवण्यात आला आहे. याच दरवाजाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राम मंदिराला आज सोन्याचा पहिला दरवाजा बसवण्यात आला. तर येत्या तीन दिवसांमध्ये आणखी 13 सोन्याचे दरवाजे बसवले जाणार आहेत. तसेच गर्भगृहाच्या मुख्य दरवाजांचे पूजन पूर्ण झाले आहे. तर आता गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजाचे काम सुरू आहे.
राम मंदिराचे लाकडी दरवाजे हैदराबादची 100 वर्षे जुनी असलेली अनुराधा टिंबर ही कंपनी तयार करत आहे. हे दरवाजे बनवण्याचे काम अयोध्येत तात्पुरत्या कार्यशाळेत बनवले जात आहेत. हे दरवाजे तयार करण्यासाठी तामिळनाडूतील कारागीर रात्रंदिवस मेहनत करत आहेत. तसेच आता तयार झालेल्या या दरवाजांवर असलेले हत्ती, कमळ आणि काही उत्कृष्ट डिझाईन त्याला भव्यता आणि आकर्षकता देत आहेत. तसेच मंदिराचा हा पूर्ण दरवाजा सोन्याने मढवला आहे.
https://twitter.com/aquibmir71/status/1744712707784478778
दरवाजाच्या कार्यशाळेत काम करणारे शेखर दास यांनी सांगितले की, या दरवाजांच्या डिझाइनमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे, जेणेकरून त्याला भव्यता येईल. तसेच या दरवाजांवर हिंदू धर्मात शुभ प्रतिक मानली जाणारी चिन्हेही कोरण्यात आली आहेत.