पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी १३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधींचे स्वागत केले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी या परिषदेमध्ये इंग्लडचे राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडचे राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद यांनी भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधील संबंधाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंग्लंड आणि भारत संबंध अधिक घट्ट करण्याचे काम केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या शुभेच्छा दिल्या. लॉर्ड तारिक अहमद पुढे म्हणाले, ”पंतप्रधान मोदी तुम्ही इंग्लंड आणि भारताच्या संबंध अगदी जिवंत ठेवले आहेत. मी माझे पंतप्रधान ऋषी सुनक, भारताचे जावई यांच्याकडून देऊ इच्छितो. जागतिक गुंतवणूकदारांना कसे आकर्षित करावे यासाठी या परिषदेने खरोखरच एका मास्टर क्लासच्या स्वरूपात काम केले आहे. आपले दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या खूप लांब आहेत. मात्र आपल्या लोकांमध्ये असलेले चांगले संबंध यामुळे हे अंतर कमी होऊ शकते.”
लॉर्ड तारिक अहमद हे मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि यूएनचे राज्यमंत्री आहेत. तसेच संघर्षामध्ये लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी पंतप्रधानांचे विशेष प्रतिनिधी आहेत. पुढे बोलताना लॉर्ड तारिक म्हणाले, ”आम्ही आमच्या उच्च शिक्षण संस्थांमधील जवळचे सहकार्य सक्षम करण्यासाठी नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. आम्हाला आम्हाला सर्जनशील अर्थव्यवस्था, कलाकारांचे पालनपोषण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या क्षेत्रात पुढे जायचे आहे.”