Pankaj Tripathi : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी लवकरच त्यांच्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाद्वारे थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कोणतेही ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी विशेषत: मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागते. मग अनेकदा अभिनेते त्यांच्या पात्रांना न्याय देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करताना दिसतात. तर असे म्हटले जाते की, ज्येष्ठ अभिनेते बेन किंग्सले यांनी 1982 मध्ये आलेल्या ‘गांधी’ चित्रपटात महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर बापूंच्या या भूमिकेसाठी बेन किंग्सले यांनी फक्त शाकाहारी आहार घेतला होता. तसेच त्यांनी जमिनीवर झोपण्याचा सराव देखील केला होता.
दरम्यान, पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेबाबत बोलताना म्हणाले की, ‘मैं अटल हूं’मधील माजी पंतप्रधानांची व्यक्तीरेखा साकारणे मला अवघड गेले नाही, कारण अटल बिहारी वाजपेयींचे पालनपोषण ज्या पद्धतीने झाले होते त्याच पद्धतीने माझेही झाले होते. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला कोणतीही अडचण आली नाही.
पुढे पंकज त्रिपाठी म्हणाले की, “दिग्दर्शक विनोद भानुशाली यांना खात्री होती की जोपर्यंत मी ही भूमिका करण्यास सहमती देत नाही तोपर्यंत तो चित्रपट बनवणार नाही. माझा जीवन प्रवास अगदी साधा होता. माझे वडील पुजारी आणि शेतकरी होते. तर अटलजींचे वडील हे शिक्षक होते. मी अशा कुटुंबातून आलो आहोत जिथे प्रत्येकजण साधे म्हणजेच धोतर, कुर्ता असे कपडे घालत असे. त्यामुळे चित्रीकरण करताना ते कपडे घातल्याने मला आराम वाटला. तसेच माझे पालनपोषण आणि अटलजींचे पालनपोषण काहीसे सारखेच होते. लहानपणी आम्ही जमिनीवरच झोपायचो त्यामुळे मला चित्रीकरणादरम्यान जमिनीवर झोपण्याचा सराव करण्याची गरज पडली नाही.”
तसेच या भूमिकेसाठी स्वत:ला कसे तयार केले? याबद्दल बोलताना त्रिपाठी म्हणाले की, “मला भीती वाटत होती, मी हे कसे करणार? काय होईल, कसे होईल, मला माहिती नाही. याबाबत मला विचार करायला सात-आठ दिवस लागले. मी माझ्या मित्रांचे सल्ले घेतले आणि त्यांना वाटले की मीच योग्य व्यक्ती आहे. तसेच निर्माते विनोद भानुशाली मला म्हणाले की, ‘तुम्ही ही भूमिका साकारली नाही तर मी हा चित्रपट करणार नाही’. मात्र, मला भीती वाटत होती. आदरणीय अटलजींच्या व्यक्तिरेखेला मी कितपत न्याय देऊ शकेन हे मला माहिती नाही. पण त्यांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते.
“अटलजी हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाची कथा दोन तासांच्या कथेत सिनेमात आणणे शक्य नाही”, असेही पंकज त्रिपाठी म्हणाले. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी केले आहे. तर हा चित्रपट 19 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.