नवी दिल्ली : 14 जानेवारीपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू होणार आहे. तर या यात्रेबाबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणारी भारत जोडो न्याय यात्रा कोणत्याही परिस्थितीत मणिपूरपासूनच सुरू होईल. तसेच ते म्हणाले की, काँग्रेस मणिपूर सरकारला सहकार्य करण्यासही तयार आहे.
वेणुगोपाल म्हणाले की, “भारत जोडो यात्रा कोणत्याही परिस्थितीत मणिपूरमधून सुरू होईल. आम्हाला या यात्रेचे राजकारण करायचे नाही. आम्हाला मणिपूरवरून कोणताही वाद घालायचा नाही. हे शांततापूर्ण प्रदर्शन आहे. आम्ही भारतातील लोकांसाठी विशेषत: मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागत आहोत. म्हणूनच आम्ही ईशान्येकडील राज्यातून यात्रेची सुरुवात करत आहोत. आम्ही सरकारला कोणत्याही स्तरावर सहकार्य करण्यास तयार आहोत. पण आम्ही यात्रेला मणिपूरमधूनच सुरुवात करू.
सुरक्षा यंत्रणांकडून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अहवाल मिळाल्यानंतरच यात्रेला परवानगी दिली जाऊ शकते, असे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी म्हटले आहे. “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत नाजूक आहे. राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी देणे सक्रिय विचाराधीन आहे, आम्ही विविध सुरक्षा यंत्रणांकडून अहवाल घेत आहोत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही ठोस निर्णय घेऊ,” असे बिरेन सिंह यांनी सांगितले.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी इंफाळ येथून सुरू होणार आहे. ही यात्रा 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा विभाग आणि 110 जिल्हे कव्हर करणार आहे. तर राहुल गांधी अमेठी, रायबरेली आणि वाराणसीसह प्रमुख मतदारसंघ कव्हर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 20 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत ही पदयात्रा संपणार आहे.
“न्याय का हक मिलने तक” असा या यात्रेचा नारा आहे. काँग्रेसने 6 जानेवारीला पक्षाच्या आगामी यात्रेचा लोगो आणि घोषवाक्य अनावरण केले आहे. तर दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात झालेल्या अनावरण कार्यक्रमासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस प्रभारी कम्युनिकेशन्स जयराम रमेश आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
“राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 14 जानेवारीपासून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करत आहोत. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ही देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने आमचे भक्कम पाऊल आहे,” असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.