काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु करणार आहे. ही यात्रा मणिपूरमधून सुरु होणार आहे. मात्र या दरम्यान मणिपूर सरकारने भारत जोडो न्याय यात्रेसाठी इंफाळ मधील पॅलेस मैदानाची परवानगी नाकारली आहे. यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला हा धक्का समजला जात आहे. दरम्यान काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली असून, यात्रेची सुरुवात इंफाळमधूनच होईल असे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस १४ जानेवारीपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार आहे. या यात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात ही यात्रा पार पडणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून जाणार आहे. याची सुरुवात इंफाळ मधून होणार आहे. मात्र मणिपूर सरकारने यात्रेसाठी पॅलेस मैदानाची परवानगी नाकारली आहे. यात्रेचा शेवट हा महाराष्ट्रामध्ये केला जाणार आहे.
दरम्यान मणिपूर सरकारला काँग्रेसच्या यात्रेची भीती वाटत असल्यानेच त्यांनी परवानगी दिली नाही असा आरोप करण्यात येत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ही यात्रा थांबणार नसून, याची सुरुवात मणिपूरमधूनच होणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. या यात्रेसाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून वेळोवेळी त्यावर यात्रेबाबत माहिती अपडेट केली जाईल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.