माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी केले होते. भाजप उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार गटाच्या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले होते. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, यावर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून भाजप कडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला होता.
आव्हाडांवर देशभरातून टीकेची झोड उठल्यानंतर आव्हाडांनी स्वत:आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.