राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मलिक हे दोन महिन्यांच्या जामिनावर बाहेर आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन 6 महिन्यांनी वाढवला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक हे तुरूंगात होते. मात्र, तुरूंगात असताना त्यांना मूत्रपिंडाचा विकार झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी 2 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. तर आता न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करत त्यांना सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे. नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन वैद्यकीय आधारावर मंजूर करण्यात आला आहे.
नवाब मलिकांना आधी दिलेल्या जामीनाचा कालावधी संपुष्टात येताच त्यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली होती. तसेच मलिकांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत आणि त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशील न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आले होते. त्यानंतर खंडपीठाने मलिकांना अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मलिकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.