राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र माेदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी रोड शो करणार असून त्यानंतर ते दक्षिण गंगा अशी ख्याती असलेल्या गाेदावरीची महाआरती करून काळारामा मंदिरात नतमस्तक हाेतील. त्यानंतर राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत हाेणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही या दाैऱ्याची पुष्टी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निलगिरी बाग येथील हेलिपॅड ते पंचवटीतील तपोवनातील कार्यक्रम स्थळ असा साधारणत: दोन किलोमीटरचा रोड शो होणार आहे.त्यामध्ये राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती सहभागी होतील.विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होत आहे.त्याचे उद्घाटन तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यासाठी राज्यभरातून पोलीस व्यवस्थेमध्ये असणार आहेत. नाशिक शहरातील 800 पोलीस आणि राज्याच्या विविध भागातून सुमारे 2500 पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या आता नाशिकमध्ये पोहोचू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्डचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या काळाराम मंदिरातून या नव्या पॅटर्नची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.