उजनी हे भीमा नदीवरील एक मोठे धरण आहे. मात्र यंदा झालेल्या कमी पावसामुळे आणि नियोजन नीट नसल्याने उजनी धरणातील पाणीसाठा खालावला आहे. उजनी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिका,पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी ५ हजार क्युसेक निसर्गाने पाणी पुरवठा केला जात आहे. उजनीमध्ये केवळ ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाण्याचे बचत कशी करता येईल आणि त्यांसाठी योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास आगामी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागू शकते.
उजनी धरणाची पाणी पातळी खालावली असल्यामुळे सोलापूर महापालिका सावधान झाली आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर सोलापूर महापालिका थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. सोलापूर महापालिकेने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. पाण्याचा अनावश्यक वापर सोलापूरमध्ये सातत्याने दिसून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.