आजपासून (11 जानेवारी) माहोली येथे अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हा सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर वर्षभराहून अधिक कालावधीनंतर रोहित शर्मा टी-20 संघात पुनरागमन करत आहे. मात्र, भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने काही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या टी-20 सामन्यातून माघार घेतली आहे. पण तो नंतरचे दोन सामने खेळणार असल्याचे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे.
टी-20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पुनरागमन झाल्याने विश्वचषकासाठी त्यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. तसेच भारताला 2022 च्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटपासून दूर राहिले होते. पण आता त्या दोघांनीही भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे.
तर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने अफगाणिस्तान मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टी-20 संघात समावेश करण्याच्या भारताच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी रोहित आणि विराटची उपस्थिती आवश्यक आहे असे डिव्हिलियर्सला वाटते.
डिव्हिलियर्सने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “हा एक क्रिकेट विश्वचषक आहे. त्यामुळे विराट कोहली चांगला खेळाडू आहे तर त्याला खेळावेच लागेल. 20 वर्षांच्या मुलांनाही समजते की टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला दिग्गज रोहित आणि विराटची गरज आहे. मी 35 वर्षांचा असताना माझ्याकडेही असे व्यवस्थापन असते.
त्यामुळे मला वाटते की भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आपल्या T20 संघात समाविष्ट करून आपला हेतू दाखवला आहे. ते स्पष्टपणे T20 विश्वचषकाबद्दल विचार करत आहेत.”
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 सामन्यात रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळतील.
संघात शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यासह अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हे लेगस्पिनर असतील, तर आवेश खान, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार वेगवान गोलंदाजी सांभाळतील. तसेच शुबमन गिल, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि टिळक वर्मा हे संघाचे इतर फलंदाज आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन T20 सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर. , अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.