सुरत : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर या सोहळ्याआधी गुजरातमधील सुरत येथील 42 गर्भवती महिलांनी अयोध्येतील भगवान रामाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी अनोखे योगदान दिले आहे. या भव्य सोहळ्याच्या आधी या 42 गर्भवती मातांनी 21 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये 21 वेळा ‘जय श्री राम’ हा मंत्र लिहिला आहे. गर्भ संस्कार समुपदेशक अमिषा बेन यांनी या उपक्रमाचे मार्गदर्शन करताना ‘राम’ 21 वेळा लिहिण्याचे सखोल महत्त्व सांगितले आहे.
अमिषा बेन यांनी सांगितले की, “‘राम’ हे नाव 21 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये 21 वेळा लिहिले गेले आहे. म्हणजेच 21 x 21 = 441 आणि 4+ 4 +1=9. त्यामुळे 9 हा अंक अतिशय शुभ मानला जातो. तसेच प्रभू रामांचा जन्मदिवस म्हणजे राम नवमी. तर 27वे नक्षत्र हे नऊचे प्रतीक आहे. या उपक्रमाचा उद्देश भक्तीची भाषा, रामाची भाषा आणि कंपनांच्या माध्यमाद्वारे मुलाची आध्यात्मिक आणि भावनिक पातळी देवाकडे वळवणे हा आहे. मग सतयुगापासून कलियुगपर्यंत ‘राम’ म्हणतच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे रामाशिवाय आरंभ आणि अंत दोन्ही शक्य नाही. तर याच हेतूने अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून हे कार्य हाती घेण्यात आले आहे.
21 वेगवेगळ्या भाषांमध्ये श्री रामाचे नाव लिहिणाऱ्या विश्वा बेन म्हणाल्या की, आता संपूर्ण देश रामाच्या आगमनाचा उत्सव साजरा करत आहे, आम्हीही आमच्या मुलांमध्ये रामसदृश गुण रुजवण्याच्या उद्देशाने राम मंत्राचा जप सुरू केला आहे आणि त्यांची नावे लिहिली आहेत. मी प्रभू रामाचे नाव 5000 वेळा लिहिले आहे आणि जेव्हा मी हा मंत्र लिहिला तेव्हा मला सकारात्मक ऊर्जा मिळाली.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी होणार्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 4,000 संतांना आमंत्रित केले आहे. तसेच 16 जानेवारीपासून सुरू होणारा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा हा सात दिवस चालणार आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला पहाटे पूजेनंतर, दुपारी ‘मृगशिरा नक्षत्र’मध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.