भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन आणि जाहीर सभेनिमित्त नाशिकच्या व मुंबईतील अटल सेतूच्या उदघाटनाच्या कार्यमानिमित्त आले आहेत. नाशिकमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची महापूजा केली. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये भव्य रोड शो देखील केला.
पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये भव्य रोड शो केल्यानंतर रामकुंड परिसराला देखील भेट दिली. त्यानंतर मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी नाशिकची प्रसिद्ध पैठणीचा शेला देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीरामाची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान पंतप्रधान मोदी यांचे ओझर विमानतळावर स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नाशिकमध्ये २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातून तरुण नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये मोदी तरुणांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील अटल सेतूचे उदघाटन करणार आहेत. तसेच उरण येथील रेल्वेमार्गिकेचे देखील उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.