मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदचा सहकारी हाफीज अब्दुल सलाम भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरूंगात मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिलने दिली आहे. तसेच सात महिन्यांपूर्वीच भुट्टावीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानच्या तुरूंगात हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी हा शिक्षा भोगत होता. तसेच त्याचा सात महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. पण याबाबतची माहिती आज समोर आली आहे. 29 मे 2023 रोजी पंजाब प्रांतातील तुरूंगात भुट्टावीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
मास्टरमाईंड हाफीज सईदचा उपनेता म्हणून भुट्टावी हा कार्यरत होता. नोव्हेबर 2008 मध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर काही दिवसांतच हाफीज सईदला ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे या काळात भुट्टावीने लष्कर-ए-तैय्यबाचा दैनंदिन कार्यभार सांभाळला होता. तो संघटनेतील सदस्यांना निर्देश द्यायचा आणि त्याने आपल्या भाषणातून मुंबई हल्ल्यासाठी आत्मघातकी पथक तयार करण्यासाठी मदत केली होती. या हल्लामध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक गंभीर जखमी झाले होते.