आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आजचा दिवस आपल्या राज्यासाठी महत्वाचा आहे असे म्हणत तरी हरकत नाही. आज पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यामध्ये तब्बल ३० हजार कोटींपेक्षा अधिक विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. त्यामध्ये अटल सागरी सेतू व रेल्वे मार्गिकांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
आज पंतप्रधान सर्वप्रथम नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन विधिवत महापूजा देखील केली. यावेळी त्यांना येवल्याच्या पैठणीचा शेला देखील भेट देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवकांना संबोधित करणार आहेत. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईकडे रवाना होतील. ३० हजार कोटींच्या विकासकामांमध्ये ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबईतील मेट्रोचे औपचारिक उदघाटन, उरणमधील उपनगरीय रेल्वे मार्गिकेचा समावेश आहे.
दरम्यान, ओझर विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये भव्य रोड शो देखील केला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नाशिक आणि मुंबईमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.