आज पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. तसेच ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये युवकांना संबोधित करणार आहेत. या कार्य्रक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये बोलत होते. त्यावेळेस ते बोलताना म्हणाले, ”नाशिकसारख्या पवित्र भूमीमध्ये युवा महोत्सव होत आहे ही, आमच्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये आज आपले पंतप्रधान आले आहेत. अयोध्येमध्ये उभे राहणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उदघाटनाच्या आधीच हा शुभ संकेत आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहावे , त्याचे निर्माण व्हावे असे करोडो भारतीयांचे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न, या देशातील सर्व नागरिकांचे स्वप्न आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. मोदी हे तो मुमकिन है. आमचे पंतप्रधान लक्षद्वीप मध्ये काय गेले तिकडे मालदीवमध्ये भूकंपच आला. आता आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिमंत कोणीही करू शकत नाही. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटल सेतू या सागरी मार्गाचे, नवी मुंबईतील मेट्रो १ चे तसेच उरण येथील उपनगरीय मार्गिकेचे उदघाटन करणार आहेत. याआधी त्यांनी नाशिकमध्ये भव्य असा रोड शो केला. तसेच नाशिकमधील प्रसिद्ध अशा रामकुंडाला देखील भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसिद्ध काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले व प्रभू श्रीरामाची महापूजा देखील केली.