अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे नवाजुद्दीन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. तर आता नवाजुद्दीन दाक्षिणात्या मनोरंजन सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याच्या या नवीन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याचा अपघात झाला आहे.
नवाजुद्दीन ‘सैंधव’ या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या या चित्रपटाचे शूटींग श्रीलंकेत सुरू आहे. तर सैंधव या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीनचा अपघात झाला. या चित्रपटाचे शूटिंग समुद्रात सुरू होते. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि नवाजुद्दीन जहाजात पडला. सुदैवाने तो समुद्रात पडण्यापासून थोडक्यात बचावला. महत्त्वाचे म्हणजे नवाजुद्दीनच्या या अपघाताचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
नवाजुद्दीनचा ‘सैंधव’ हा नवीन चित्रपट 13 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी नवाजुद्दीनने खास तेलुगू भाषा शिकली आहे. त्यामुळे त्याचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.
दरम्यान, या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत श्रद्धा श्रीनाथ, वेंकटेश, रूहानी शर्मा, मुकेश ऋषी, जिशू सेन गुप्ता आणि अंड्रिमा जेरेमिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती निहारीका एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.