नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बनवून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मोदी लक्षद्वीपमध्ये गेले अन् मालदीवमध्ये भूकंप आला, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेले आणि मालदीवला मोठा भूकंप आला. म्हणजेच मोदी लक्षद्वीपला गेल्याने मालदीवमधील लोकांचा जळफाट झाला आणि त्यांनी स्वत:चे नुकसान करून घेतले. त्यामुळे आता आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. हे फक्त आपल्या पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळेच होत आहे. मोदी आहेत तर सर्व काही शक्य आहे. आज संपूर्ण जगभरात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींमुळे आज देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मोदींना कोणी बॉस म्हणते तर कोणी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास उत्सुक असते. आज मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले हे आपले भाग्यच आहे.
आम्हाला राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी दिली हे आमचे सौभाग्य आहे. तसेच पंतप्रधान मोदी रामाच्या पवित्र भूमीत आले ही गौरवाची बाब आहे. मोदींनी अयोध्येत राम मंदिर बनवून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 10.30 वाजता त्यांचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांचा भव्य रोड शो पार पडला. यावेळी मोदींवर हजारो नाशिककरांनी फुलांची उधळण केली. तसेच मोदींनी रामकुंड परिसराला भेट देऊन तेथील काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांचे येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन स्वागत करण्यात आले.