आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. तसेच यावेळी त्यांनी 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये युवकांना संबोधित केले. मेड इन इंडिया उत्पादनाचा वापर करा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका, कोणतीही नशा करू नका. तसेच माता बहिणींवरून शिव्या देऊ नका, अपशब्द वापरू नका, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान मोदींनी युवकांना दिला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणायचे की, भारतातील सर्व युवकांची बुद्धी आणि त्यांचे चरित्र यावर भारताची वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे हे मार्गदर्शन आजच्या युवाशक्तीसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. आज आपला भारत देश जगातल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आला आहे. यामागे भारतीय युवकांचे मोठे योगदान आहे.
आता आपल्या नव्या पिढीकडे अमृतकाळात भारत देश नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे असे काम करा की तुमचे नाव जगाच्या आणि भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. यामुळे पुढच्या शतकात त्या वेळची पिढी तुमची आठवण काढेल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे करू शकता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तर आता आमच्या सरकारला 10 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही या काळामध्ये युवकांना खुले आकाश मिळावे, त्यांच्यासमोरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. तसेच युवकांसाठी शिक्षण, रोजगार, स्टार्टअप असे सर्वकाही सुरू केले आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.