आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते नाशिक आणि मुंबईमधील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी युवकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. सर्वप्रथम त्यांनी वीरमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. आपल्या भाषणातून त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आलो आहे हे माझे मोठे सौभाग्य आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या वीरभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली यासाठी मला आनंद झाला आहे. देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांना माझी विनंती आहे की, १४ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये सर्व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवावी. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाला जन्म दिला. याच भूमीने अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे अशी रत्ने दिली.”
या भाषणामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना तीन महत्वाचे सल्ले दिले आहेत. यामध्ये त्यांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा वापर करावा, तसेच नशा होणाऱ्या वस्तूंपासून दूर राहावे व आई बहिणीवरून शिव्या देणे , अपशब्द वापरणे बंद करावे असे तीन मंत्र मोदींनी युवकांना दिले.