देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे म्हणजेच अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या सागरी सेतुमुळे केवळ २० ते २२ मिनिटांमध्ये मुंबईमधील माणूस नवीन मुंबईमध्ये जाऊ शकणार आहे. या सागरी सेतुमुळे राज्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सागरी सेतूचे उदघाटन आज पार पडले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री, सरकारमधील मंत्री, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमधील दोन तासांचे अंतर आता २० ते २२ मिनिटांवर आले आहे. यामुळे उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. राज्याच्या विकासामध्ये अटल सेतू फार मोठी भूमिका बजावणार आहे. मालवाहतूक जलद होणार असल्यामुळे उद्योग आणि व्यापाराला देखील फायदा होणार आहे. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल करण्यात येणार आहे. हा सागरी सेतू अंदाजे २१,००० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबई- गोवा महामार्ग कमी वेळेत गाठता येणार आहे. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू इंजिनिअरिंग क्षेत्रातला एक चमत्कारच आहे. आता या सेतूमुळे राज्याच्या विकास अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी प्रभू श्रीरामाची महापूजा देखील केली. तसेच २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात त्यांनी युवकांना मार्गदर्शन देखील केले. या भाषणामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना तीन महत्वाचे सल्ले दिले आहेत. यामध्ये त्यांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा वापर करावा, तसेच नशा होणाऱ्या वस्तूंपासून दूर राहावे व आई बहिणीवरून शिव्या देणे , अपशब्द वापरणे बंद करावे असे तीन मंत्र मोदींनी युवकांना दिले.