पुणे : प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीतातील मोठे नाव. आज ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी प्रभा अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रभा अत्रे यांना मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.
प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये असल्याने ते इकडे आल्यावर प्रभा अत्रेंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. प्रभा अत्रे किराणा घराण्याच्या गायिका होत्या. प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान आणि कायद्याची पदवी संपादन केली. तसेच संगीतामध्ये त्यांनी डॉक्टरेट देखील मिळवली आहे. प्रभा अत्रे यांनी संगीत क्षेत्रात एकूण ११ पुस्तके लिहिली आहेत.