दिल्लीमधील दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स बजावले आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने १८ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटल्याप्रकरणी घोटाळ्याप्रकरणी बजावलेले हे चौथे समन्स आहे. २ नोहेंबर , २१ डिसेंबर आणि ३ जानेवारी या तारखेला ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवले होते. मात्र तीन समन्स देऊन देखील केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. आतातरी ते चौकशीसाठी ईडीकडे हजेरी लावणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
ईडीने ३ जानेवारी रोजी समन्स बजावल्यानंतर आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. मात्र ईडीने दिलेले समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. चौकशीला बोलावून केजरीवाल यांना अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता. चौथे समन्स बजावल्यानंतर पक्षाकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. ईडीचे समन्स आल्यानंतरच केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता पक्षाच्या नेत्यांनी वर्तवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, याआधी दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीला हे समन्स अवैध असल्याचे सांगितले. ईडीने मला पाठवलेले समन्स हे ”खोटे समन्स” असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. तसेच हे समन्स कसे बेकायदेशीर आहे हे त्यांनी ईडीला सांगितले. तसेच ते म्हणाले, ”प्रामाणिकता” हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती आहे.