देशामध्ये यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. लवकरच निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात देखील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या एक दोन वर्षांत झालेल्या उलथापालथीमुळे राज्यातील लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही. मात्र एकमेकांविरुद्ध लढण्याऐवजी आता आपापसांतच लढतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे दक्षिण मुंबईची जागा कोणाकडे जाणार? ठाकरे गटाकडे की काँग्रेसकडे? या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.
देशात आणि राज्यात भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक मोठ्या ताकदीने एकटवले आहेत. मुंबईमधील काही मतदारसंघावर ठाकरे गटाकडून आणि काँग्रेसकडून दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतरदारसंघावर ठाकरे गटाचा दावा सांगितला. यामुळे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. कंदाची मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपा व शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाने दावा केल्याने देवरा नाराज असल्याचे बोलले जात आहे.