पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुरुलीयामध्ये हिंसक जमावाने तीन साधूंवर जीवघेणा हल्ला केला आहे . हे साधू गंगासागर यात्रेसाठी निघाले होते.काशीपूरमध्ये त्यांनी गावक-यांना रस्ता विचारला त्यावेळी गावातील काही लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली.पोलिसांनी वेळीच धाव घेत हिंसक जमावाच्या तावडीतून या साधूंची सुटका केली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांनी तीन साधूंवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात हजर केले. पुरुलियाचे पोलीस अधीक्षक, अविजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, तीन साधूंवर झालेल्या हल्ला प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”साधूंनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरु आहे.”असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पोलिसांनी साधूंना शक्य ती सर्व मदत केली व त्यांच्या वाहनाची दुरुस्ती देखील करण्यात आली. साधूंवर हल्ल्याची माहिती मिळताच, ”पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी साधूंना सर्व प्रकारची मदत केली. तसेच तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांची दुरुस्ती देखील करण्यात आली,” असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन साधू उत्तर प्रदेशातून वाहन भाड्याने घेऊन गंगासागर जत्रेला जाण्यास निघाले होते यावेळी रस्ता चुकला,म्हणून त्यांनी तीन मुलींना रस्ता विचारला असता साधूंना पाहताच मुली ओरडत पळत सुटल्या. यानंतर स्थानिक लोकांनी साधूंना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.