जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलालांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पूंछ सेक्टरजवळ असणाऱ्या कृष्णा घाटीच्या जंगलातून जात असताना या संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यामधील कोणीही जखमी झाले नाही. शुक्रवारी संध्याकाळी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर पूंछ सेक्टरमध्ये लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे.
लष्कराने सुरु केलेल्या शोध मोहिमेमध्ये श्वान पथकाची देखील मदत घेतली जात असल्याचे लष्कराने सांगितले. संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर पुंछमध्ये सुरक्षा वाढवल्यामुळे तेथील वाहनांचीही तपासणी केली जात आहे.
भारतीय लष्कराने याबाबत ‘एक्स’ एक पोस्ट शेअर केली आहे. आज पूंछ भागातील कृष्णा घाटी जंगलातून जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आमच्या सैनिकांना काहीही झाले नाही. भारतीय लष्कर आणि जेकेपी यांच्या संयुक्त शोध मोहिम सुरू आहेत.” तर गुरुवारी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. या बैठकीत जम्मू विभागातील विकास आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत ड्रग तस्करी करणारे, अमली पदार्थांचे हॉट स्पॉट आणि सीमेपलीकडून होणाऱ्या तस्करीविरुद्ध व्यापक धोरण आखण्याचा गरजेवर चर्चा करण्यात आली.