शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय..? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उपस्थित केलाय. आगामी 22 जानेवारीला अयोध्येत होणारा कार्यक्रम आणि पंतप्रधानांवर शंकराचार्यांकडून टीका करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राणे बोलत होते.
अयोध्येत आगामी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी हरकत घेतली आहे. निर्माणाधिन मंदिरात अयोग्या तिथीवर मूर्तींची स्थापना झाल्यास देव नव्हे तर भुतांचा वास होईल असे शंकराचार्य म्हणाले. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते हा सोहळा होत असल्यावरून देखील त्यांनी संताप व्यक्त केला. शंकराचार्यांऐवजी दुसरे कुणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कशी करू शकतो .? असा सवाल देखील शंकराचार्यांनी उपस्थित केला होता. शंकराचार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नारायणा राणे म्हणाले की, इतक्या वर्षांनंतर राम मंदिर होत असल्याचे त्यांना कौतुक नाही. जे आजवर कुणी करू शकले नाही ते पंतप्रधान आणि भाजपने केले. तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी ? शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे ? ते सांगावे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शंकराचार्य भाजप आणि मोदींनी राजकीयदृष्टीकोनातून पाहत आहेत. परंतु, राम आमचा देव असून मंदिर हा धर्माचा विषय आहे. रामाची मूर्ती आपल्या स्थानी येत आहे. आम्हाला दर्शन घेता येणार आहे. याचे आम्हाला समाधान आहे, असे राणेनी सांगितले.