स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत गायकीवरही अत्रे यांचे प्रभुत्व होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावान आणि श्रेष्ठ कलावंताला मुकला आहे, अशा भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
त्यांचे गायन कला क्षेत्राला प्रेरणा देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ‘किराणा ‘ घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभाताई यांनी बालपणापासून संगीताची आराधना केली. विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन करणाऱ्या अत्रे यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचविणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.