भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज नागपूरमधील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी स्मृती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे दर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक परमपूज्य गुरुजींना आदरांजली वाहिली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, ”नागपूरमध्ये येऊन स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गुरुजींना श्रद्धांजली वाहिली.” दरम्यान, एस. जयशंकर यांनी आदल्या दिवशी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील आदरांजली वाहिली. ”दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून माझ्या नागपूर दौऱ्याची सुरुवात केली.” एस. जयशंकर यांनी एक्स वर पोस्ट शेअर केली.