येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर आता मध्य प्रदेशातील श्री महाकालेश्वर मंदिराकडून रामलल्लाला 5 लाख लाडू अर्पण केले जाणार आहेत.
श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात प्रसाद म्हणून 5 लाख लाडू तयार करून पाठवणार आहे. या 5 लाख लाडूंचे वजन सुमारे 250 किलो आहे. तर हे लाडू बनवण्यासाठी 80 क्विंटल तूप, 70 क्विंटल चणाडाळ, 90 क्विंटल साखर, 20 क्विंटल रवा, 10 क्विंटल काजू, 5 क्विंटल बेदाणे आणि 1 क्विंटल वेलची एवढे सामान वापरले जाणार आहे. तर याबाबतची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे.
रामलल्ला यांच्या अभिषेक प्रसंगी जगभरातून भेटवस्तू येत आहे. यामध्ये आता या खास अभिषेक प्रसंगी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातून 5 लाख लाडू अर्पण करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या खास सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 4,000 संतांना आमंत्रित केले आहे. तसेच 16 जानेवारीपासून सुरू होणारा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा हा सात दिवस चालणार आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला पहाटे पूजेनंतर, दुपारी ‘मृगशिरा नक्षत्र’मध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.