महामार्ग आणि वाहतुकीच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी शहरांमध्ये प्रवासी ड्रोनचा वापर केला जाईल, अशी घोषणा नितीन गडकरींनी केली आहे. या ड्रोनमध्ये चार जण प्रवास करू शकतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा शहराच्या मध्यापासून ते विमानतळापर्यंत उपलब्ध होणार आहे.
एअरक्राफ्ट मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉल डेपोमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी प्रवासी ड्रोनची कल्पना मांडली. एमआरओ क्षेत्राच्या वाढीबाबत ते म्हणाले की, भविष्यासाठी हा अत्यंत विश्वासार्ह उद्योग आहे. 2013 पासून विंग डिझाइनमधील बदल प्रवासी ड्रोनसाठी मार्ग मोकळा करत आहेत.
पुढे नितीन गडकरींनी जैवइंधनाबाबत सांगितले. ते म्हणाले की, विमानांसाठी जैवइंधन कसे तयार करायचे यावर साखर कारखान्यात संशोधन सुरू आहे. लवकरच तांदळापासूनही जैवइंधन बनवले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही तर महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांनाही फायदा होणार आहे. तसेच जैव विमान इंधनाचा वापर 2026 पर्यंत सुरू होऊ शकतो, असेही गडकरींनी सांगितले.
दरम्यान,सध्या बहुतेक व्यावसायिक ड्रोन पॅकेजचा वापर डिलिव्हरीसाठी करतात, कारण त्यांची क्षमता मर्यादित आहे. पण आता असे ड्रोन बनवले जाऊ लागले आहेत जे माणसांनाही घेऊन जाऊ शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रवासी ड्रोनचा वापर लहान प्रवासासाठी किंवा अधूनमधून सहलीसाठी केला जाऊ शकतो. हे प्रवासी ड्रोन 2026 पर्यंत पूर्ण होऊ शकते.