नवी दिल्ली : संसद घुसखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नार्को आणा पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टनंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीमध्ये आणले आहे. तसेच आता पोलिसांनी घुसखोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण याबाबत मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार मनोरंजन डी असल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. तर पोलिसांनी यापूर्वी संसद घुसखोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शिंदे, सागर शर्मा, मनोरंजन डी, ललित झा, नीलम आझाद आणि महेश कुमावत या सहा आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाकडून या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच नीलम आझाद वगळता उर्वरित पाच आरोपींना ८ डिसेंबर रोजी ‘पॉलिग्राफ’ चाचणीसाठी गुजरातला नेण्यात आले होते. नीलम यांनी कोर्टासमोर ‘पॉलिग्राफ’ चाचणी करण्यास संमती दिली नव्हती. तर सागर आणि मनोरंजन यांची नार्को टेस्ट आणि ‘ब्रेन मॅपिंग टेस्ट’ देखील करण्यात आली होती. तर या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमधून मनोरंजन हा या घुसखोरीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर आत्तापर्यंतच्या तपासात आणि चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की, आरोपींना सरकारपर्यंत एक संदेश पोहोचवायचा होता. त्यासाठी त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याची योजना आखली होती. तसेच बेरोजगारी, मणिपूरचे संकट आणि शेतकरी आंदोलन या प्रश्नांवर त्यांना आवाज उठवायचा होता, असेही आरोपींनी उघड केले आहे.
दरम्यान, 13 डिसेंबर रोजी संसद अधिवेशन सुरू असताना सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. तसेच, दोघांनीही घोषणाबाजी करताना धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तर अमोल शिंदे आणि नीलम आझादने संसद भवन परिसराबाहेर ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा देत धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. आणि ललित झाने नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यानंतर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले होते.