सध्या दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा ‘हनुमान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. भगवान हनुमानाभोवती फिरणाऱ्या सुपरहिरो-थीमवर हा चित्रपट आधारित आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वी हनुमान चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले होते की, या चित्रपटाच्या विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटातील 5 रूपये अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केले जाणार आहेत. तर आता या चित्रपटाच्या टीमने जमा झालेल्या आपल्या पहिल्या कमाईतील मोठी रक्कम राम मंदिराला दान केली आहे.
याबाबत प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, आम्ही हनुमान चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईतून 14 लाख रूपये राम मंदिराला दान केले आहेत. जेव्हा आमच्या निर्मात्यांनी राम मंदिर बांधल्याबद्दल ऐकले तेव्हा हा चित्रपट हिट होईल किंवा पैसे कमावेल की नाही याची पर्वा न करता, त्यांनी चित्रपटासाठी विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटातून 5 रूपये दान करण्याचा निर्णय घेतला. तर आता या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईतून राम मंदिराला सुमारे 14 लाख रूपये दान केले आहेत.
तसेच ज्या प्रकारे हनुमान चित्रपटाची प्रगती होत आहे, त्याप्रमाणे भविष्यातही आपण काही कोटी रूपये कमवू शकतो आणि ते आपण राम मंदिरासाठी दान करू, असेही प्रशांत वर्मा यांनी सांगितले.
https://twitter.com/HBPrar/status/1746026116236939632
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान सुपरस्टार चिरंजीवी यांनी राम मंदिराला दान करण्याबाबतच्या कल्पनेबाबत माहिती दिली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रत्येक तिकिटातून 5 रूपये दान केले जातील, असे चिरंजीवी यांनी सांगितले होते. तर पुढे हनुमानला मिळालेला प्रतिसाद बघता प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आता आम्ही लवकरच ‘जय हनुमान’च्या म्हणजेच या चित्रपटाच्या सीक्वेलचे काम सुरू करणार आहोत.