“कवडशांचे फूल” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
पुणे : “कवडशांचे फूल” या संजीवनी बोकील लिखित कथा संग्रहाचा प्रकाशन सभारंभ पार पडला. यावेळी “माझ्या घरी तीन कवी आणि लेखक आहेत. त्यांच्यामुळे मी सुजाण वाचक झाले. वाचनाने मला अभिनेत्री म्हणून समृध्द केलं. पुस्तकं मला खूप प्रिय आहेत. नव्या पुस्तकाचा गंध मला मोह घालतो. “कवडशांचे फूल” हा एका कवयित्रीचा कथासंग्रह आहे हे नावापासून लक्षात येतं. प्रतिभेच्या हातात हात घालून वास्तवाचा साक्षात्कार घडवणाऱ्या त्यांच्या कथा मला खूप आवडल्या. उपमा, अलंकार, प्रतिमा आणि प्रतिके यांचा अद्भूत अविष्कार घडवणारे साहित्य लोकप्रिय असते. संजीवनी यांच्या सर्व कथांमध्ये असा अविष्कार विखुरला आहे “, असे विवेचन सुप्रसिध्द अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे, साहित्य अभ्यासक कल्याणी हर्डीकर आणि स्वतः लेखिका संजीवनी बोकील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना चिन्मयी सुमीत यांनी आपल्या पुण्यातील वास्तव्याच्या आणि वडिलांच्या आठवणी जागवल्या. त्या म्हणाल्या की, संजीवनीताईंच्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन माझ्या वडिलांनी केले होते आणि आता माझ्या हस्ते आज त्यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन होत आहे, हा योगायोग माझ्यासाठी खूप भावूक करणारा आहे. म्हणूनच संजीवनीताईंशी माझे एक आत्मीय नाते आहे,” असे सांगून त्यांनी उपस्थितांना पुस्तक विकत घेण्याचं आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजीव बर्वे म्हणाले, संजीवनी बोकील यांच्या कथा शब्दांचे दागिने लेवून आणि उपमा अलंकारांनी सजल्या आहेत. आमच्या प्रकाशनाच्या तज्ज्ञ लेखक समितीने संजीवनी यांच्या पुस्तकाला “उत्कृष्ट” असा अभिप्राय दिल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. पुस्तकातील विविध कथांचा आढावा घेऊन काही निवडक उतारे त्यांनी वाचून दाखवले.
पुढे पुस्तकाच्या लेखिका संजीवनी बोकील यांनी भावपूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “आयुष्यातले काही अनुभव हे थेट रक्तात भिनून काळजात उतरतात. अशाच काही उत्कट अनुभवांच्या कथा “कवडशाःचे फूल” होऊन त्याचे पुस्तक साकारले, पण पुस्तक साकारणे म्हणजे आपल्या आत विस्तारत जाणाऱ्या माणुसपणाची अभिव्यक्तीच असते.” असे सांगून संजीवनी बोकील यांनी उपस्थित सर्व सुहृदांचे आणि पुस्तक निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचा त्यांनी कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला.
मर्मज्ञ साहित्य अभ्यासक कल्याणी हर्डीकर यांनी नव प्रकाशित पुस्तकाचा परिचय साक्षेपाने करून दिला. त्या म्हणाल्या, ” या कथासंग्रहातील सात कथा म्हणजे, सात पाकळ्याच्या कवडशांचं फुल आहे. मनाला अस्वस्थ करणारी ही कथाबिजं अत्यंत अस्सल आहेत. चित्रमय शब्दशैली असलेल्या या कथा स्त्रीजन्माकडे निखळपणे पाहाण्याचा दृष्टीकोण देतात. स्त्रीत्वाचे स्वत्वं आणि सत्वं यांचा विस्तारलेला पैस वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.
आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजऱ्या झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच सभागृहातील उपस्थितांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. प्रकाशनपूर्व नोंदणी केलेले वाचक आणि निमंत्रितांच्या हातात पुस्तकाची प्रत देऊन सामुहिक स्वरूपात अभिनव पद्धतीने हे प्रकाशन संस्मरणीय झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले. उत्तरार्धात ‘तरूस्मि’ समुहाचे कलाकार शंतनु पांडे, स्मिता लाटे, नीरजा धीरेंद्र, उदय पुराणिक यांनी “कवडशांचे फूल” या शीर्षक कथेचे अभिवाचन केले.