भारत जोडो न्याय यात्रा ही ध्रुवीकरणाचे राजकारण, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध उभारलेली वैचारिक लढाई आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खोचक शब्दांत टीका केली. तुकडे-तुकडे गँग ही देशाला जोडण्याचे नाटक करत आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
“काँग्रेसची विचारधारा काय आहे? ही ‘तुकडे-तुकडे’ गँग देशाला एकत्र आणण्याचे नाटक करत आहे,” अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. त्यांनी आज (14 जानेवारी) ओडिशाच्या अंगुल येथे यात्रेच्या काही तास आधी एएनआयशी संवाद साधाल, यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पुढे रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा संदर्भ देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “देश आता ‘राममय’ झाला आहे, आज रामाची विचारधारा प्रचलित आहे आणि देशाला एक नवीन जाग आली आहे. काही लोक ही प्रगती सहन करू शकत नाहीत. म्हणून ते या निरुपयोगी राजकारणात गुंतले आहेत. तसेच गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना देशातील जनतेने उत्तर दिले आहे आणि या वेळीही ते तसे करतील”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधीची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ रविवारी खोंगजोम वॉर मेमोरिअल येथे पुष्पांजली अर्पण करून सुरू होणार आहे. त्यानंतर मणिपूरच्या थौबाई येथील खोंगजोम येथील म्याय मैदान येथे या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. तर राहुल गांधी या संपूर्ण यात्रेत 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांत 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहेत.