येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर या खास सोहळ्याचे आमंत्रण अनेक नेतेमंडळी, कलाकारांना देण्यात आले आहे. त्यामुळे या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यामध्ये आता बच्चन कुटुंबीयांनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीय या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोबतच ते आता अयोध्यावासीही होणार आहेत. कारण महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्या या पवित्र शहरात घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भव्य राम मंदिर बांधले आहे त्याच जागेजवळ हा प्लॉट आहे. तर अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या या 10,000 स्क्वेअर फूट प्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बिग बींनी हा प्लॉट ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या बॅनरअंतर्गत विकत घेतला आहे. तसेच ज्या दिवशी अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा आयोजित केला जाईल, त्याचदिवशी बिग बींच्या घराच्या कामाच्या सुरूवात होणार आहे.
याबाबत अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात म्हणाले होते की, “माझ्या हृदयात एक विशेष स्थान असलेले शहर, अयोध्येतील सरयूच्या द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा सह या प्रवासाची सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे. अयोध्येचे एक विशेष स्थान आहे. ही अयोध्येच्या आत्म्यापर्यंतच्या मनःपूर्वक प्रवासाची सुरुवात आहे जिथे परंपरा आणि आधुनिकता अखंडपणे एकत्र आहेत. तर या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बनवताना मला खूप आनंद होत आहे.”
दरम्यान, या खास सोहळ्याला राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, संजय लीला भन्साळी, सनी देओल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, रजनीकांत, अक्षय कुमार, चिरंजीवी, धनुष, अजय देवगण, प्रभास, यश, मधुर भांडारकर यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत.