पुणे | शरद मोहोळ हत्या प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर आता या प्रकणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रविवारी रात्री नवी मुंबई परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंडला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.
5 जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळवर गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे शरद मोहोळचा खून त्याचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. तर या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली होती. तर आता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंडला ताब्यात घेतले आहे.
मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस मुख्य मास्टरमाईंडचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना मुख्य मास्टरमाईंड गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेलार, मारणेसह अन्य 6 जणांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
तर या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळची हत्या करण्यापूर्वी गोळीबार करणारे मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबाराचा सराव केला होता. आरोपींनी मध्यरात्री झाडाच्या बुंध्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून सराव केला होता. त्यामुळे याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्थानकात आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.