राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर घातपात घडवून आणणार असल्याची माहिती देणारा एक फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. घातपात करण्याची धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती नियंत्रण रूमला फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.
तर फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत आहेत. तसेच ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्याबाबत बोलत होते. सोबतच ते मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्याने घेणार असल्याचेही बोलत होते.
हे धक्कादायक संभाषण कानावर पडताच त्या व्यक्तीने ही संपूर्ण माहिती तातडीने महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करून दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास त्यांनी सुरू केला आहे.