नवी दिल्ली : सध्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी दिल्लीतून भिंतीवर चित्रे काढण्यास सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी भिंतीवर ब्रशने निवडणूक चिन्ह कमळ काढले आणि ‘एक बार फिर से मोदी सरकार’ असा नारा दिला.
यावेळी जेपी नड्डा म्हणाले की, “आजपासून ‘एक बार फिर मोदी सरकार’चा नारा देत आमचा देशव्यापी ‘वॉल रायटिंग’ कार्यक्रम सुरू झाला आहे. भारतातील जनतेला पुन्हा मोदी सरकार स्थापन करण्याचे आमचे आवाहन आहे. देशाला पुढे नेण्यासाठी देशात स्थिरता आणि स्थिर सरकारची गरज आहे, म्हणून या ‘वॉल रायटिंग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतातील जनतेला मोदी सरकारला मते देण्यासाठी आवाहन करत आहोत.
याआधी रविवारी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी एका कार्यक्रमात कमळाचे चिन्ह भिंतीवर रंगवले होते. तसेच यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 450 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री साहा म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. यावेळी भाजप 404 जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे, पण माझा विश्वास वेगळा आहे. यावेळी भाजप लोकसभा निवडणुकीत आणखी 450 जागा जिंकेल, असा विश्वासही साहांनी व्यक्त केला आहे.