देशामध्ये यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. सध्या सत्तेत असलेले मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. ‘इंडी’ आघाडी असे नाव देत अनेक पक्ष भाजपला पराभूत करण्यासाठी जवळ आले आहेत. तसेच अजून जे पक्ष आघाडीमध्ये सामील झाले नाहीत, त्यांनी सामील होण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. मात्र बहुजन समाजवादी पार्टीने एक वेगळा निर्णय घेतला आहे.
बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षासोबत न जात बहुजन समाजवादी पार्टी हा स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मायावती यांनी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पक्षाच्या अध्यक्ष मायावती म्हणाल्या, ”आमचा पक्ष स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवेल आणि चांगला निकाल प्राप्त करेल. आघाडीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढल्यामुळे त्याचा पक्षाला फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. तसेच अखिलेश यादव हे सरड्याप्रमाणे रंग बदलत असतात. तर यांच्यापासून पक्षाच्या लोकांनी सावध राहावे. मी संन्यास घेणारे अशा अफवा उठवल्या जात आहे, मात्र मी आताच संन्यास घेणार नसून, पक्षासाठी अखेरपर्यंत काम करणार आहे.”
दरम्यान, एनडीए विरुद्ध ‘इंडी’ आघाडी यांच्यामध्ये लोकसभेत सामना पाहायला मिळणार आहे. मोदी सरकारने केलेली विकासकामे आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर लोकसभेचा प्रचार करण्याची शक्यता आहे तर, विरोधक मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी महागाई, तपास यंत्रणांचा गैरवापर अशा मुद्द्यांवर प्रचार करण्याची शक्यता आहे. मायावती यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने ‘इंडी’ आघाडीला उत्तर प्रदेशमधेय एका प्रकारचा धक्का समजला जात आहे.