येत्या 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. याआधी अयोध्येत अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. काही दिवसांतच अयोध्येमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवही आयोजित केला जाणार आहे. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयोध्येत स्वच्छ तीर्थ अभियान सुरू केले आहे. सीएम योगींनी अयोध्येतील लता मंगेशकर चौकात झाडू मारून या मोहिमेची सुरुवात केली.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केवळ अयोध्येतच नाही तर दिल्लीतही स्वच्छ तीर्थ अभियान सुरू करण्यात आले. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी देखील दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराची स्वच्छता करताना दिसल्या. तर लोकांना त्यांच्या सभोवतालची ठिकाणे तसेच तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
अयोध्येचे महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी आणि शहराचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत स्वच्छ तीर्थ मोहिमेत भाग घेतला. स्वच्छ तीर्थ मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी अयोध्येत आलेले मुख्यमंत्री योगी यांनी नंतर बस स्थानकापासून इलेक्ट्रिक बसेस आणि ई-वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी, भाजप प्रदेश सरचिटणीस धरमपाल सिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि राज्याचे अधिकारी जिल्ह्यांमध्ये पोहोचले. येथे त्यांनी स्थानिक लोकांना स्वच्छतेसाठी हातभार लावण्यासाठी प्रोत्साहित केले. अशाप्रकारे भाजप नेत्यांनी लोकांना वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छ तीर्थ अभियान सुरू केले आहे.