केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरी बेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले.त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे .राजेश्वरी बेन या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वी त्रास वाढल्याने त्यांना अहमदाबादहून मुंबईला हलवण्यात आले होते मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.बहीण राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
राजेश्वरी बेन यांच्या पार्थिवावर दुपारी थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत राजेश्वरीबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली” अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील राजेश्वरीबेन शाह यांना ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या थोरली बहीण राजेश्वरीबेन यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रुजूबेन अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. भाऊ -बहिण या नात्याची व्याख्या करताच येत नाही. हे नातं सगळ्या नात्यांच्या पलीकडचं! अमितभाईंसाठी ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. याप्रसंगी मी शाह कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. राजेश्वरीबेन यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. अमितभाई आणि शाह कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांति!”, असे चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.