नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (15 जानेवारी) प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमादरम्यान पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “पीएम जनमान महाअभियानाचा हा उद्देश आहे की सरकारची प्रत्येक योजना आदिवासी गटांपर्यंत पोहोचावी, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता माझा एकही मागास बंधू-भगिनी सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
“सध्या देशात सणासुदीचे वातावरण आहे. उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल, बिहू हे सण साजरे केले जात आहेत. तर एकिकडे अयोध्येत दिवाळी साजरी होत असताना, दुसरीकडे माझे एक लाख अत्यंत मागासलेले आदिवासी बांधव आणि माझ्या कुटुंबातील भगिनी, त्यांच्या घरी दिवाळी साजरी करत आहेत, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज पक्क्या घरासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होत आहेत. मी या सर्व कुटुंबांचे अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असेही मोदींनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, “22 जानेवारीला प्रभू राम देखील आपल्याला त्यांच्या भव्य मंदिरात दर्शन देतील. तसेच मी भाग्यवान आहे की मला अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सोबतच मी राम लल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीपर्यंत विशेष 11 दिवसीय ‘अनुष्ठान’ (विधी) सुरू केले आहेत.
तसेच प्रभू रामाची कथा हा माता शबरीशिवाय शक्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते म्हणाले की जेव्हा प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला. त्यानंतर प्रभू राम हे लोकांसमोर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून समोर आले. रामायणातील कथेनुसार, शबरी भगवान रामासाठी बोरी तोडायची. ती एक बोर तोडायची, त्याची चव चाखायची आणि जर ते गोड असेल तर ती तिच्या टोपलीत ठेवायची. तसेच एकदा प्रभू राम शबरीच्या आश्रमात आले तेव्हा तिने त्यांना ती बोरे खायला दिली होती. रामाला चांगली बोरे देण्याचा तिचा मानस होता, असेही मोदींनी सांगितले.