राज्यभरात तापमानामध्ये कमालीची घट होताना दिसून येत आहे. उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रात देखील जाणवू लागली आहे. राज्यात गारठा वाढताना दिसत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे. वातावरणात काहीसा बदल झाल्यामुळे पुन्हा राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मकर संक्रांतीनंतर राज्यातील वातावरणातील थंडी हळू हळू कमी होताना दिसून येते. मात्र सध्याच्या वातावरणामुळे मकर संक्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका अजूनही जाणवत आहे. राज्यासह देशातील वातावरणात काहीसा बदल बघायला मिळत आहे. मागील काही दिवस कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , कोकण या भागांमध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यात पुढील तीन ते चार दिवस गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील होताना दिसत आहे.